मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२५

वीर मुरारबाजी देशपांडे

 * वीर मुरारबाजी देशपांडे



मुरारबाजी हे मराठा सैन्यातील शिलेदार होते. महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजीचे मुळ गाव होय. मुरारबाजी देशपांडे हे पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार होते.  इ.स.१६६५ साली मोघलांनी पुरंदर किल्ल्याला घातलेल्या वेढ्यात त्यांनी किल्ल्यांचे संरक्षण करत आणि मराठा सैन्याचे नेतृत्व करत कणखर अशी झुंज दिली पण याच लढाईत त्यांस वीरमरण आले.

इ.स.१६५६ मध्ये शिवरायांना जावळीच्या स्वारीतून एक अमुल्य रत्न मिळाले होते. या रत्नाचे नाव "मुरारबाजी देशपांडे" होते. मुरारबाजी देशपांडे हे सुरवातीला जावळीच्या चंद्रराव मोरे ह्यांच्याकडे काम करायचे. महाराजांच्या जावळीच्या छाप्याच्यावेळी चंद्रराव मोरे ह्यांचा पराभव करून त्यांची गादी उलटवली. याच छाप्याच्यावेळी महाराजांनी मुरारबाजीना पाहिले ते मावळ्यांना आडवे आले.मुरारबाजींनी मावळ्यांविरुद्ध तिखट तलवार चालवली. मावळ्यांना एक पाऊलही पुढे ते सरकून देत नव्हते. महाराजांनी मुरारबाजी मधील कर्तृत्व दुरून जाणले आणि त्यांना स्वराज्याचे महत्व पटवून देत त्यांस गोड शब्दात बोलुन आपलेसे केले. तेंव्हा पासुन महाराजांच्या प्रत्येक लढाईत आणि स्वराज्य कार्यात स्व:ताला समर्पित केले. पुरंदरला जेव्हा मुघल सरदार रजपूत मिर्झाराजे जयसिंग यांनी दिलेरखानाला सांगुन वेढा द्यायला सांगितला  तेव्हा पासून किल्लेदार म्हणुन पुरंदर किल्ला ते शर्थीने लढवत होते. पुरंदरावरील मराठयांनी मुघलांवर केलेल्या अचानक युद्धात त्यांनी पाचशे मुघल कापून जो पराक्रम केला ते पाहून दिलेरखानाने त्यांस आपलेसे करण्यासाठी जहागिरीचे अमीश दिले परंतु त्या जहागिरीच्या अमिशावर थुंकून त्यांनी स्वराज्याच्या कार्यात आपल्या चरित्राची, पराक्रमाची आणि स्वामीनिष्ठेची गाथा लिहिली. या लढाईत मुरारबाजी आणि तीनशे मावळे वीरगतीला प्राप्त झाले.


शाहिस्तेखानाची बोटे छाटल्यापासून ते सुरतेची लुट झाल्यानंतर महाराज स्वराज्य विस्तार वाढवत होते. तिथेच झाल्या घटनांपासून चवताळलेला मुघल बादशहा औरंगजेब ह्यांनी त्यावेळी हुशारीची एक खेळी खेळला. एका हिंदु राजाच्या समोर एक हिंदु राजाला पाठवले. म्हणजेच मुघली राजपुत सरदार मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान पठाण यांस स्वराज्याच्या मोहिमेवर पाठवले. त्यांस हे चांगलेच ठाऊक होते की महाराज हि लढाई शांतपणे आणि सामंजस्याने सोडवून स्वराज राखण्यासाठी प्रयत्न करतील. पुढे जर युद्ध झालेच तर मात्र लढाई करून स्वराज्य राखतील.

झालेही असेच. मिर्झाराजे यांनी स्वराज्यात येताच धुमाकुळ घातला. महाराज त्यास हिंदु राजा म्हणुन सन्मान करत त्यास भेटीचे पत्र पाठवत पण त्यांस ते उत्तर नाही देत. या मुळे मात्र महाराज थोडे चिंतीत असत. त्यांची हि चिंता सरनोबत कुडतोजीराव गुजर यांस पाहवत नव्हती ते एकटेच धाडस करून थेट मिर्झाराजे जयसिंग ह्यांच्या छावणीत घुसले त्यांना जीवे मारण्यासाठी प्रयत्न केले पण मिर्झाराजे सावध असल्यामुळे त्यांनी त्यांचा हा डाव उधळला त्यांच्या शी युद्ध करून त्यांची तलवार पाडली त्यांस मिर्झाराजे यांनी विचारले तुम्ही कोण? त्यावर कुडतोजी राव म्हणाले "मी कुडतोजी, शिवरायांचा मावळा राजानी आम्हांस पाठवले नाही आम्ही स्वतः आलो आहोत भेटायला. तुम्हाला महाराज पत्र पाठवतात पण तुम्ही त्याचा जवाब पाठवत नाही. त्यामुळे महाराज चिंतेत असतात. ती चिंता आम्हांस पाहावली नाही म्हणून तुमच्यावर वार केला." हे ऐकून मात्र एकदम हुशारीने उत्तर देतात. ते म्हणतात तुमचा हा पराक्रम आम्हास आवडला परंतु एक सांगतो. राजांना शरण यायला सांगा. तुम्ही निर्धास्त इथून जा तुम्हाला तलवार आणि घोडा बक्षीस देऊन तुमचा सन्मान करून तुम्हाला तुमच्या सरहद्दीत आमचे सरदार सोडण्यासाठी येतील. राजांना हि बातमी समजली त्यांनी कुडतोजी रावांना बोलावून घेत त्यांस जवाब विचारला त्यांनी घडलेला प्रसंग सांगितला त्यांचे हे धाडस पाहून महाराजांनी त्यास "प्रतापराव" हि पदवी दिली.पुढे जाऊन ह्यांनी मराठ्यांच्या इतिहासात आपले एक सुवर्ण पान बनविले.

यामुळे मिर्झाराजे कसा आहे हे प्रताप रावांमुळे महाराजांना समजले. महाराजांना समजुन आले ह्यांच्याशी सरळ युद्ध करणे कठीण आहे. कारण ते खुप मुत्सद्दी आणि पराक्रमी आहे. ह्यांना भेटून मातृभूमी आणि मुघलांच्या विरोधात उभे करण्यासाठी प्रवृत्त करण्याची योजना करावी लागेल.

झाल्या प्रकारामुळे मिर्झाराजांनी महाराजांस पत्र पाठवले की "आम्ही तुम्ही एकच आहोत. आम्हास भेटण्यास येणे. आम्ही तुमचे आदर पुर्वक सन्मान करु" हे पत्र महाराजांस मिळताच ते विचार करू लागले की कोणास ह्या पत्राचे उत्तर घेऊन पाठवावे तेवढ्यात महाराजांनी रघुनाथ पंडित यांस पाठवायचे ठरवले. ते थोर शास्त्रपंडित आहे. त्यांस राजपुत शास्त्र चांगलेच ठाऊक होते. त्यांस बोलवून पंडितराव  हा किताब दिला आणि वस्त्रे अलंकार देऊन सन्मान पुर्वक शत्रूंच्या छावणीत सल्ला मस्लती साठी पाठवले. छ. शिवाजी महाराजांचे पंडित आले आहेत हा समाचार मिर्झाराजांस मिळाला त्यांनी त्यांचा आदर सन्मानपूर्वक वस्त्रे अलंकार देऊन सन्मान केला. मिर्झाराजे आणि रघुनाथ पंडित यांचे बोलणे झाले. मिर्झाराजा बोलला की " दिल्लीच्या बादशाहा सोबत शत्रुत्व न धरणे त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा शेवट लागणार नाही.महाराजांनी आम्हास येऊन भेटणे आम्ही त्यांस बादशाहाशी भेट घडवून देऊ. जसा आमचा पुत्र रामसिंग तसा तुम्ही आहात.राजांनी आम्हांस येऊन भेटणे. पंडित ह्या गोष्टी साठी विचारतात  जर भेट झाली तर राजांना काही दगाफटका तर होणार नाही ना! त्यावर मिर्झाराजे म्हणतो "

शिवशंकराच्या पिंडीवर हाथ ठेऊन बेल, भंडारा आणि शुद्धिपत्र घेऊन म्हणतो राजांना कोणत्याही प्रकारचे दगा होणार नाही." हे म्हणत त्यास गुप्तपणे सांगितले की राजांनी चार पाच महिन्यांनी येऊन भेटावे तोपर्यंत गड किल्ले लढवणे आणि पराक्रम दाखविणे. हा संदेश घेऊन राजांना सांगितले. महाराजांनी तात्काळ प्रत्येक गडावर आदेश पाठवले की सैन्य तयार ठेवा. 

       महाराजांचा दुत येऊन गेल्याचे समजताच. दिलेरखान चवथाळला तो म्हणाला,"शेवटी हिंदुस हिंदु मिळाला. तो दुसऱ्यादिवशी मिर्झाराजास म्हणाला "काय म्हणून सल्ला मस्लत केली. जवळच कोंढाणा आणि पुरंदर आहे. आम्ही पुरंदर घेतो तुम्ही कोंढाणा घ्या. त्यावर उत्तर देत मिर्झाराजा बोलला की गड न घेणे मुलुख काबीज करावा. गडास कोणतेही सामान(सैन्य , जेवण, हत्यारे) पोहचवून न देणे. म्हणजे गड आपोआप हाती येतील. खान रागात येऊन म्हणाला आम्ही पुरंदर घेतो तुम्हाला कोंढाणा घ्यायचा असेल तर घ्या. असे म्हणत खान निघाला.

      इ.स.१६६५च्या आषाढात (जुन/जुलै) पुरंदरास दिलेरखानानी वेढा घातला. पुरंदर वेढा घालण्यासाठी दिलेरखानाने पाच हजार पठाण, दहा हजार बैल तोफा घेऊन आले, पेंढारा च्या आत तलवारी , खलाशी लोक वीस हजार घेऊन दिलेरखान पुरंदर जिंकण्यासाठी आलेला. त्यावेळी पुरंदर चे किल्लेदार राजांचे विश्वासू शिलेदार मुरार बाजी देशपांडे होते. त्यावेळी गडावर हजार मावळे आणि वज्रगडाचे हजार मावळे होते. असे मिळुन किल्यावर दोन हजार मावळे होते. त्यामुळे पुरंदर किल्ला लवकर हाती येईल असे दिलेरखानास वाटले. महाराजांस असे वाटले की कमी सैन्यबळ असल्यामुळे आपण काही सैन्यबळ पाठवावे परंतु खानाची फौज आणि त्यामागून काही सरदार आणि मिर्झाराजांची फौज हे गडाच्या दिशेने जाणाऱ्या वाटा अडवून बसले होते त्यामुळे सहसा पुरंदरास जाणे अवघड होते कारण जर एक सैन्याची तुकडी तोडल्यास लगेचच मागून मिर्झाराजांची आणि मुघल सरदारांची फौज येईल आणि आपणच कोंडीत फसल्यासारखे होईल. त्यामुळे आपण सैन्य इच्छा असुन देखील पाठवू शकत नसल्यामुळे या गोष्टीचे महाराजांना फार वाईट वाटत होते.

      

     (नकाशा :-https://www.facebook.com/story.php?story_fbid=2205620996344114&id=100068762172808)

     

दिलेरखान सारखा संतप्त आणि गर्विष्ठ मुघल सरदार पुरंदर घेण्यासाठी दिवस रात्र तोफांचे मारा करत आणि मुघली सैन्य गड चढण्याचे प्रयत्न करीत पण मावळे त्यांस रोखीत आणि गड हा उंच जागी असल्यामुळे तोफांचा मारा सहसा तटबंदीस लागत नव्हते. पुरंदर सहसा हाती येत नसल्यामुळे त्यांनी पुरंदरचा बालेकिल्ला असलेल्या वज्रगडावर तोफा मारायला सुरुवात केली.  त्यामुळे वायव्य कडील असलेली तटबंदी ढासळली. तत्कालीन नियुक्त झालेले वज्रगडाचे किल्लेदार यशवंत बुवाजी प्रभु आणि त्यांचे बंधु बाळाजी प्रभू ह्यांनी तीनशे मावळ्यांना घेऊन जवळ जवळ पंधरा दिवस किल्ला लढवला. मुघल सैन्यांनी वज्रगडाच्या सफेद बुरुजाची पायथ्याशी विस्फोटके लावुन तटबंदी ढासळवली आणि काळ्या बुरुजावर तोफांचा मारा करुन वज्रगडाचा काळा बुरुज पाडून वज्रगड मुघलांनी जिंकला.


 पुरंदरचा बालेकिल्ला असलेला वज्रगड पडला. वज्रगड शत्रूंच्या हाती आल्यामुळे पुरंदरावर तोफाचां मारा सुरू झाला. या परिस्थितीतही मुरारबाजी गड लढवत होते. 


       मुरारबाजीच्या मनात एक धाडसी विचार आला काही मुबलक मावळे घेऊन थेट छावणी वर हल्ला करून तोफा निकामी करायच्या त्यामुळे पुरंदराची तटबंदी डळमळीत होणार नाही. त्याच रात्रीच्या वेळी काही मावळ्यांची तुकडी घेऊन मुघल सैन्य बेसावध असताना मावळ्यांनी मुघल छावणी घुसून हल्ला चढवला. त्यामुळे एकच चकमक उडाली. मावळ्यांनी लवकरात लवकर तोफांची आग लावायची बत्ती हातोडी मारून ती बुजवून टाकली त्यामुळे तोफा आता निकामी झाल्या. बाकीचे सैन्य लढाई ला येईपर्यंत मुरारबाजी आणि मावळे हे गडावर सुखरूप पोहचले. ह्याचा फायदा असा झाला की आता दिलेरखानाला पुढची मदत मिळेपर्यंत डोंगर दऱ्यात येऊन युद्ध करावे लागणार होते आणि मावळ्यांना डोंगरदऱ्यात हरवणे अशक्य आहे हे दिलेरखानास चांगलेच ठाऊक होते.


    इ.स.११ जून१६६५ चा तो भयाण दिवस उजाडला. तोफा निकामी केल्याच्या घटनांमुळे मुरारबाजींचा आत्मविश्वास वाढला त्यांना हे ठाऊक होते की आता सहसा मुघल सैन्य आक्रमण करणार नाही. दिलेरखानाला जर रसद आणि तोफा मिळाल्या तर पुरंदर गड पडल्याशिवाय राहणार नाही जर आताच पुन्हा एकदा आक्रमण केले तर दोन गोष्टी घडतील पहिली "जर युद्ध झाले आणि दिलेरखानाला मारून मुघल सैन्याला माघारी फिरवले तर विजय आपलाच होईल. वज्रगड पण हाती येईल आणि पुरंदरसाठी ते चांगलेच हिताचं ठरेल" आणि दुसरी "जर युद्धात अपयश आले तर स्वराज्याच्या कार्यात कामी होण्याचं भाग्य लाभेल."


     हा विचार करून अवघे सातशे मावळे घेऊन आणि स्वतः दोन्ही हातात फिरंगी तलवार घेऊन मुरारबाजी गड उतरून युद्धाला गेले. पण ह्यावेळी मात्र दिलेरखान सावध होता त्याला माहीत होते की आता मावळे कधीही आक्रमण करतील.मराठयांनी पुन्हा एकदा अचानक मुघलांच्या छावणीवर हल्ला चढविला. सावध असलेल्या दिलेरखानानी देवडी (आताचे देवाडी) पर्यंत पळत एका मोकळ्या जागेवर येऊन थांबला. तिथपर्यंत येई पर्यंत मुरारबाजी यांनी स्वतः पाचशे मुघल सैन्य मारले. देवडी वर येताच मोघलानी प्रतिकार म्हणुन मावळ्यांवर बाण चालवले. या बाणामुळे साठ मावळे वीरगतीला प्राप्त झाले. यामुळे मुरारबाजींना वाईट वाटले. "महाराजांचे नावाजलेली लोक या लढाईत खर्ची झाली आता महाराजांस काय मुख दाखवू" असे मनातल्या मनात म्हणत दिलेरखानाच्या दिशेने पुढे सरकत मुघल सैन्य कापत दिलेरखानाजवळ आले. त्यांच्या हा पराक्रम पाहुन दिलेरखान युद्ध थांबवून त्यास म्हणतो "अरे वाह! समशेर बहादुर तुझा पराक्रम पाहुन मी खुश झालो. अरे तु कौल घे मोठा मर्दानी शिपाई म्हणून तुझ नावाजितो " यावर चवताळलेले मुरारबाजी त्यास म्हणाला" तुझा कौल घे म्हणजे काय?,आम्ही शिवाजी राजांचे शिपाई, तुझा कौल घेतो काय? असे म्हणत पुन्हा युद्ध सुरू करून मुघल सैन्याला कापत मुरारबाजी ने दिलेरखानाच्या दिशेन झेप घेतली.मुरारबाजी दिलेरखानावर तलवार उचलणार तितक्यात दिलेरखानने  त्याच्यावर बाण मारला.

मुरारबाजी पडला आणि त्याचवेळी दिलेरखान म्हणाला " "असा शिपाई खुदा ने पैदा केला".

      मुरारबाजी आणि तीनशे मावळे वीरगतीला प्राप्त झाले.आणि ४००मावळे परत गडावर पोहचले. दिलेरखानाने शपथ घेत म्हणाला"जेव्हा गड घेईल तेव्हाच पगडी घालेल" अशी त्यांनी प्रतिज्ञा केली." आणि गडाला वेढा घालून बसला. मुरारबाजी पडला म्हणुन काय झाले आपण हा गड शर्थीने लढवू, आम्ही तैसेच शुर आहोत.असे म्हणत मावळे पुन्हा युद्ध करायला लागले.

    हि बातमी महाराजांस कळाली महाराजांस खुप दुख झाले. त्यांनी मिर्झाराजेस तात्काळ भेटण्यासाठी पत्र पाठवले. महाराज मिर्झाराजेस भेटून त्यांनी पुरंदरचा तह केला.


स्वामिनिष्ठ मुरारबाजी हे स्वराज्याचे प्रती एकनिष्ठ होते. त्यांचे देशासाठी, मातृभूमीसाठी एकनिष्ठ कसे व्हावे हे गुण आपण शिकले पाहिजे.


लवकरच त्यांच्या जीवनावर आधारित शिवराज अष्टक या चित्रपट मालिकेतून दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे  नरवीर मुरारबाजी देशपांडे हा चित्रपट आणणार आहेत.


संदर्भ :-

 १) सभासदांची बखर, कृष्णाजी अनंत विरचित पान क्रमांक -४० ते ४३ पर्यंत.


२)नकाशा:-https://www.facebook.com/story.php?story_fbid=2205620996344114&id=100068762172808


3) राजा शिवछत्रपती मालिका २००८ , Ep-१४८  ते १६० 


४) https://www.discovermh.com/murarbaji-deshpande/


५) मुरारबाजी यांचे चित्र : - https://www.esakal.com/manoranjan/historical-marathi-movie-on-veer-murarbaji-deshpande-release-date-nsa95



लवकरच काही न ऐकलेल्या मावळ्यांची आणि त्यांच्या पराक्रमाची माहिती मी माझ्या ह्या ब्लॉग च्या माध्यमातून देणार आहे. आणि ते पण ऐतिहासिक कागपत्रे द्वारे ते मांडण्याचे प्रयत्न करीत आहे. जर कोणास काही ऐतिहासिक संदर्भ माहीत असेलेले लेख,पुस्तके (pdf) असेल तर त्यांनी मला comment box मध्ये सांगावी. जेणे करून ते अधिक प्रभावीपणे मांडण्यास मदत मिळेल.  


छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🏻🚩

जय महाराष्ट्र 🙏🏻 🚩



वीर मुरारबाजी देशपांडे

 * वीर मुरारबाजी देशपांडे मुरारबाजी हे मराठा सैन्यातील शिलेदार होते. महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजीचे मुळ गाव होय. मुरारबाजी देशपांड...